नव्या कोरोना व्हायरसमुळे मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना सज्ज आणि सावध राहण्याचे आदेश

कोरोनाच्या नव्या व्हायरसची जगभरात दहशत

Updated: Dec 22, 2020, 07:07 PM IST
नव्या कोरोना व्हायरसमुळे मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना सज्ज आणि सावध राहण्याचे आदेश title=

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाची दहशत जगभरात पसरलेली असताना राज्यातही भीतीचं सावट पसरलंय. लंडनहून दिल्लीत आलेल्या विमानात पाच प्रवासी कोरोनाबाधित झाल्यामुळे देशात सर्वत्र खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सावध राहण्याचे आदेश दिलेयत. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी.'

जगात कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. याता कोरोनाच्या नव्या विषाणूवर कोरोनाची लस प्रभावी ठरेल की नाही याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. लस उत्पादक कंपन्यांनीही लसीत आवश्यक ते बदल करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

कोरोनाचा नवा शक्तीशाली विषाणू सापडल्यानं जगभरातल्या आरोग्य यंत्रणा पुन्हा टेन्शनमध्ये आले आहेत. राज्याल 15 दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 11 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी आहे. 

युकेमधून येणाऱ्या विमानांवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. पण आज जे विमानं आली आहेत. त्यापैकी सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मुंबईसह राज्यात यामुळे सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले होते. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क आहे.

मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, राज्य टास्कफोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी आदी उपस्थित होते.