मुंबईतील 'या' चहा विक्रेत्याची जोरदार चर्चा

मुंबईतील एका चहा विक्रेत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कोण आहे हा चहा विक्रेता आणि त्याची एवढी चर्चा का होत आहे.

Updated: Oct 31, 2020, 08:36 AM IST
मुंबईतील 'या' चहा विक्रेत्याची जोरदार चर्चा

मुंबई : एका चहा विक्रेत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कोण आहे हा चहा विक्रेता आणि त्याची एवढी चर्चा का होत आहे. तुम्हालाही उत्सुकता आहे ना. चला मग पाहू या! 

वय वर्ष फक्त १४. मुंबईतील भेंडी बाजारात राहणारा सुभान. लॉकडाऊनमुळे त्याच्यावर चहा विकण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी भरायला पैसे नाहीत. त्यामुळे त्याने चहा विकून पैसे कमवण्याचं ठरवले. लॉकडाऊनमुळे शाळेच्या बस बंद झाल्या अन् आईची नोकरी गेली. आईला हातभार लागावा आणि चार पैसे घरात यावेत या उद्देशाने लहान वयातच धंदा करण्याची वेळ सुभानवर आली. 

सुरुवातीला सुभान घरूनच चहा विकत होता. मात्र पैसे कमी मिळत असल्याने आता तो सायकलवरून आपला व्यवसाय करत आहे. घराजवळच्या परिसरातल्या दुकानांत गरमागरम चहा देतो. 

पाहा सुभान काय सांगतो !

याबाबत सुभान सांगतो, बाबा १२ वर्षापूर्वीच गेले. लॉकडाऊनमुळे आईचा जॉब गेला म्हणून मी चहा विकायला लागलो. थोडे पैसे मिळवतो. मी आता सगळीकडे फिरून चहा विकतो गेले ५ -६ महिने झाले लॉकडाऊन झाल्यानंतर मी चहा विकायला लागलो दिवसाला ३०० - ४०० कमावतो. 

लॉकडाऊनमुळे शाळा बंद 

लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. ऑनलाईन शाळेमध्ये शिकल्यासारखे वाटत नसल्याने चहाचा धंदा करून चार पैसे सुभान कमावतो. मात्र आता शाळा सुरू झाल्यावर पुन्हा एकदा शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची सुभानची इच्छा आहे. इतकंच नाही तर सुभानला आपले स्वत: हक्काचं दुकानंही घ्यायचे आहे. आलेल्या बिकट परिस्थितीतून एवढ्या लहान वयात सकारात्मक विचार करत कुटुंबाची जबाबदारी एवढ्याशा खांद्यावर घेणाऱ्या या सुभानची चर्चा तर होणारच ना. 

युवा शिवसेना त्याच्या मदतीसाठी 

'झी २४ तास'ने रस्त्यावर चहा विकणाऱ्या सुभान शेखची बातमी दाखवल्यानंतर युवा सेना त्याच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तातडीची मदत म्हणून सुभानच्या आईच्या अकाऊंटवर युवा सेनेने २१ हजार रूपये ट्रान्सफर केलेत. शिवाय अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तू पाठवल्यात. शिवाय सुभानच्या शाळेची फी देखील युवा सेना भरणार आहे.