मुंबई: महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक'चा आज 58 वा वर्धापन दिन...प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम आज सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख-नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाच्या नेते-पदाधिकाऱ्यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष असेल... आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा, संसदेत मोदी सरकार विरोधातील अविश्वासदर्शक ठरावाच्या मतदानावर टाकलेला बहिष्कार, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत एनडीएला केलेलं मतदान, मोदी-शाह यांच्याशी नव्यानं सुरु झालेला संवाद, महाराष्ट्रात पेटलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, भगव्या दहशतवादाच्या आरोपांनी पुन्हा अडचणीत आलेली सनातन प्रभात संस्था या आणि अशा अनेक ताज्या घडोमोडींवर उद्धव ठाकरे मार्गदर्शनपर भाषणात नेमकी काय मार्मिक भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता असेल.
शिवसेनेच्या ईशान्य मुंबई विभात वादांची मालिका सुरूच आहे. मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी, शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. मुखपत्र 'सामना'त आज (सोमवार,१३ ऑगस्ट) तशी घोषणा करण्यात आली आहे. तसेत, शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी उफाळून आली असतानाच, मुंबईचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केलाय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.