धारावीत कोरोनाचा वेग मंदावला; राज्यात ३९४ नवे रुग्ण

३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन 

Updated: Apr 24, 2020, 09:25 PM IST
धारावीत कोरोनाचा वेग मंदावला; राज्यात ३९४ नवे रुग्ण title=

मुंबई : सध्या करोनासाठी धारावी हा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. धारावीमध्ये आज पुन्हा ६ नवीन रुग्ण सापडले आहेत. या सहा रुग्णांमध्ये ३६ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. गोपीनाथ कॉलनी, कल्याणवाडी, जनता नगर, बनवारी कंपाऊंड गल्ली, मौलाना आझाद नगर या भागातील हे रुग्ण आहेत, असे पालिकेने नमूद केले. धारावीत कोरोना रुग्णांची संख्या २२० वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे या धोकादायक व्हायरसमुळे १४ जणांनी आपले प्राण गमावले आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे, गुरूवारी धारावीत २५ नवीन रुग्ण आढळले होते. आज फक्त ६ मिळाल्यामुळे रुग्णवाढीचे प्रमाण हळूहळू घटत असल्याचं समोर येत आहे. दाट वस्ती असलेला परिसर अल्यामुळे पालिकेला याठिकाणी उपाययोजना करणं फार कठिण जात होत. दरम्यान रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे पालिकेच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समोर येत आहे. 

तसेच, राज्यात गेल्या २४ तासांत ३९४ रूग्ण वाढले आहेत तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना  रुग्णांची संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित केलं त्याला गुरुवारी २३ एप्रिल रोजी एक महिना पूर्ण झाला. आधी २१ दिवसांसाठी घोषित केलेला लॉकडाऊन नंतर ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. याचा अर्थ असा नाही की, संकट गेले आहे. या परिस्थितीतही नागरिकांनी काळजी घ्यावी आणि घरीच राहावे.