दिलासा! ८२ वर्षीय महिलेची कोरोनावर मात

कोरोनावर मात करण्यासाठी वयाची मर्यादा नाही 

Updated: Apr 10, 2020, 07:32 AM IST
दिलासा! ८२ वर्षीय महिलेची कोरोनावर मात  title=

मुंबई : कोरोनाने मुंबईला आपल्या जाळ्यात ओढलं आहे. दिवसेंदिवस मुंबईच्या कोरोनाग्रस्त आकडेवाढीत वाढ होत आहे. कोरोनाचा धोका हा बालकांना आणि वृद्धांना जास्त असल्याचं म्हटलं जातंय. पण असं असलं तरीही या नकारात्मक वातावरणात एक दिलासा देणारी घटना समोर आली आहे. एका ८२ वर्षीय महिलेने कोरोनावर मात करून ठणठणीत बरी होऊन घरी गेली आहे. 

मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये या महिलेला एक आठवडा ठेवण्यात आलं होतं. उपचार घेऊन बरी होऊन ही महिला घरी गेली आहे. या अगोदर केरळातील एका ज्येष्ठ दाम्पत्याने कोरोनावर मात केली आहे. देशातील हे सर्वात वृद्ध कोरोनाबाधित रूग्ण असल्याची माहिती आहे. ९३ वर्षीय पुरूष आणि त्यांची ८८ वर्षांच्या पत्नीने कोरोनावर मात केली आहे. 

या वृद्ध महिलेने गुजरात मुंबई असा प्रवास केला होता. यामुळे काळजी म्हणून तिच्या मुलाने कोरोनाची चाचणी करून घेतली. महिलेला कोरोनाची लक्षण फार प्रमाणात आढळून आली नव्हती. मात्र काळजी म्हणून तपासणी करून घेतली. रिपोर्ट पॉझिटीव्ह येताच महिलेला कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली. (कोरोनापेक्षा 'हे' भयंकर... सरकारच्या हेल्पलाईनवर बाल अत्याचार आणि हिंसाचाराबद्दल ९२,००० फोन कॉल) 

'आई, घरी येईपर्यंत खूप तणावाचं वातावरण होतं. आता सगळं खूप छान आहे,' असं त्यांचा मुलगा सांगतो. एवढंच नव्हे तर घरी गेल्यानंतरही त्यांच्या चाचण्याकरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे की, कोरोनावर मात करण्यासाठी वयाची मर्यादा नाही. तुम्ही योग्य ते उपचार घेऊन पुरेशी काळजी घेतली तर कुणीही कोरोना व्हायरसवर मात करू शकतो.