A to Z : राज ठाकरे ज्यांच्यावर बोलतात ते जेम्स लेन प्रकरण नेमकं आहे तरी काय?

उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांंनी हाच प्रचाराचा मुद्दा बनवत भाजप-शिवसेनेला अडचणीत आणलं. कोण कुठला तो जेम्स लेन त्याला भारतात फरफटत आणू अशी घोषणाही आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली होती.

Updated: May 3, 2022, 05:50 PM IST
A to Z : राज ठाकरे ज्यांच्यावर बोलतात ते जेम्स लेन प्रकरण नेमकं आहे तरी काय?  title=

मुंबई : 13 फेब्रुवारी 2003.. दोन दशकं झाली. महाराष्ट्रात जेम्स लेन ( James Lane ) नावाचं एक वादळ आलं. आताच्या परिस्थितीत हे वादळ नेमकं कुठून आलं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा त्याच्याशी काय संबंध आहे हे अनेकांना माहीतही नसेल.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackarey), दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Babasheb purandare) आणि भाजप (BJP) हे नेहमी एकमेकांवर टीका करताना त्याचा संदर्भ देतात. गेली दोन दशकं हे जेम्स लेन नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर येऊन बसलंय.

नेमकं काय आहे हे जेम्स लेन प्रकरण याचा हा उहापोह...

कोण आहेत जेम्स लेन?

जेम्स लेन हे अमेरिकेतले इतिहास आणि धर्म या विषयांचे प्राध्यापक. अमेरिकेतील मिनियापोलिस राज्यातील मॅकालस्टर कॉलेजमध्ये ते प्रोफेसर आहेत. आशियातील धर्म आणि इस्लाम हा त्यांच्या विशेष अध्ययनाचा विषय. हारवर्ड विद्यापीठातून त्यांनी पी.एचडी केलं आहे.

जेम्स लेन यांनी 1989 साली ’व्हिजन ऑफ गॉड : थिओफनी नॅरेटिव्ह्ज इन द महाभारत’ नावाचं पुस्तक लिहिलं. 2001 साली त्यांनी ’द एपिक ऑफ शिवाजी’ नावाचं पुस्तक लिहिलं. 2003 साली त्यांनी ’शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ पुस्तक प्रसिद्ध केलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 13 फेब्रुवारी 2003 या दिवशी हे पुस्तक प्रकाशित केलं.

छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj ) यांच्या जीवनाची माहिती या पुस्तकात देण्यात आली. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात त्यांनी शिवाजी महाराजांची पहिली ओळख कशी झाली हे सुरुवातीलाच सांगितलं आहे. ’1988 साली माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील चौथीच्या मुलांसाठी तयार करण्यात आलेलं एक पुस्तक दिलं. त्याचं नावं शिवचरित्र (1985) होतं. या पुस्तकाचा उद्देश महाराष्ट्रातील मुलांना शिवाजी महाराजांनी 350 वर्षांचं परदेशी आक्रमणांची म्हणजे इस्लामी सत्ता कशी उलथवून स्वराज्याची स्थापना केली हे सांगणं होता.’ असं ते म्हणतात.

‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकाच्या संशोधनासाठी जेम्स लेन यांनी महाराष्ट्रातील अनेक इतिहासकारांची भेट घेतली. पुस्तकाच्या 93 व्या पानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई जिजाबाई यांच्याबद्दल बदनामी करणारा मजकूर ’गावगप्पा’ म्हणून देण्यात आला. त्याला महाराष्ट्रातील इतिहासकारांनी आणि शिवप्रेमींनी जोरदार आक्षेप घेतला.

जेम्स लेन यांना पुण्यातील काही इतिहास संशोधकांनी मदत केल्याचा ठपका काही इतिहास तज्ज्ञांवर ठेवण्यात आला. त्यांच्यावर टीका करण्यात आली. जेम्स लेन प्रकरणाचे महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात हिंसक पडसाद उमटले. निदर्शने करणार्‍यांमध्ये संभाजी ब्रिगेड ( Sambhaji Bigred ) आघाडीवर होती.

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 5 जानेवारी 2004 रोजी हल्ला केला. तेथील पुस्तकांची नासधूस केली, तर कपाटे फोडण्यात आली. या संस्थेत भारताच्या इतिहासावर संशोधन आणि लिखाण होतं. पण, काळजीपूर्वक जतन करण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आणि पुराव्यांचं मोठं नुकसान या हल्ल्यात झालं. याला ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग होता.

2004 सालच्या जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ( VIlasrao Deshmukh ) यांनी या पुस्तकावर बंदी घातली. 2004 ची लोकसभा निवडणूक तोंडावर होती. केंद्रात वायपेयींच्या नेतृत्वात भाजप सरकार होतं. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील ( R. R. Patil ) यांंनी हाच प्रचाराचा मुद्दा बनवत भाजप-शिवसेनेला अडचणीत आणलं. कोण कुठला तो जेम्स लेन त्याला भारतात फरफटत आणू अशी घोषणाही आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली होती. मराठा समाजाची मतं एकवटण्यासाठी राष्ट्रवादीला या मुद्द्याचा फायदा झाला.

2007 साली लेखक आणि प्रकाशकांनी माफी मागितली. पुढील आवृत्त्यांमध्ये हा मजकूर वगळू असं आश्वासन दिलं. त्यानंतर 2007 साली या पुस्तकावरील बंदी उठवण्यात आली. बंदी उठवण्याच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

पुस्तकावरील बंदी उठली आणि पुण्यातली लाल महालातून 2010 साली दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला गेला. पुण्यात अनेक दशकांपासून धुमसत असलेल्या जातीय वादाला जेम्स लेनच्या निमित्ताने तोंड फुटलं होतं.

बाबासाहेब पुरंदरेंची यांची भूमिका

जेम्स लेन हा पुण्यात आला तेव्हा त्यांना इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांनी त्याला चुकीची माहीती दिली असा आरोप करण्यात आला. बाबासाहेब हयात असेपर्यंत ते या राजकीय आरोप-प्रत्यारोपात पडले नाहीत. त्यांचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबध चांगले होते. पण, जेम्स लेन प्रकरणानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली.

पुरंदरे यांनी या पुस्तकाशी कोणताही संबंध नसल्याचं जाहीर केलं. पण... बाबासाहेब यांच्यापासून इतर राजकीय पुढारी दुरावले तरी राज ठाकरे यांनी शेवटपर्यंत त्यांची बाजू घेतली. आता राज ठाकरे भाजपच्या जवळ येत असताना पुरंदरेंबद्दलची त्यांची भूमिका ही भाजपच्या भूमिकेशी मिळती-जुळती आहे.

ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी बाबासाहेब सॉफ्ट टार्गेट होते म्हणून त्यांच्यावर शरद पवार टीका करत होते असं म्हटलं. तर, त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात जिजामातेने महाराजांना घडवलं असं लिहिण्याऐवजी दादोजी कोंडदेवांनी ( Dadoji Kondev ) शिवाजी महाराजांना घडवलं, असं चुकीचं लिहिलं. त्याला माझा सक्त विरोध आहे. महाराजांना जिजामातेनेच घडवलं. सर्वांत मोठं योगदान जिजामातेचंच आहे. पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली, त्याला माझा विरोध आधी होता आणि आताही आहे.

शरद पवार यांनी आपली बाजू मांडल्यावर बाबासाहेब पुरंदरे यांचं एक जुनं पत्र पुरंदरेंचं मनसेचे संदीप देशपांडे ( Sandip Deshpande ) यांनी प्रसिद्ध केलं. 10 नोव्हेंबर 2003 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare ), प्रदीप रावत, जयसिंगराव पवार, निनाद बेडेकर ( Ninand Bedekr ), सदाशिव शिवदे ( Sadashiv Shivde ), वसंत मोरे (Vasnat More ), गजानन भास्कर मेहेंदळे ( Gajanan Mehendale ) यांनी एक पत्र पाठवलं होतं त्याची ती प्रत होती.

यात पुस्तकातला आक्षेपार्ह मजकूर वगळून 25 नोव्हेंबर 2003 पर्यंत माफी मागावी असे लिहिले आहे. या पत्राला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या मंझर खान ( Manzar Khan ) यांनी 21 नोव्हेंबर रोजी उत्तर पाठवून माफी मागितली, असं लिहीलं होतं. जेम्स लेन प्रकरणाची पुन्हा चर्चा होऊ लागली. 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड ( Pravin Gaikwad ) म्हणतात की, बाबासाहेबांनी जेम्स लेन आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं होतं. मनसे आता जे पत्र दाखवत आहे ते जयसिंगराव पवार, वसंतराव मोरे यांनी लिहीलं होतं आणि बाबासाहेबांनी त्यावर सही केली होती.

तर, टेनेसी विद्यापीठात शिक्षण घेणारे प्रणव जाधव ( Pranav Jadhv ) यांनी पुस्तकामध्ये मदत करणार्‍यांची लेन यांनी कृतज्ञता नामावली दिली आहे. त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचं नावही नाही, असं ट्वीट केलंय.

जेम्स लेन यांची मध्यंतरी एक मुलाखत झाली. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झालं आहे याचा खेद वाटत असल्याचं म्हटलं होतं. गेल्या 20 वर्षांत जातीय अस्मिता वाढली. समाज व्यवस्था, राजकारणात बदल झाले. पण, राजकीय वाद तेच आहेत.