या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही- आदित्य ठाकरे

अशी कुठली यंत्रणा असेल तर तुम्हीच मला सांगा, आपण मुंबईत आणू असेही ते म्हणाले.

Updated: Jul 2, 2019, 03:00 PM IST
या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही- आदित्य ठाकरे  title=

मुंबई : मुंबईत उद्भवलेल्या या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही असे विधान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. या नैसर्गिक संकटाचे खापर पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर फोडण्यात येत आहे. मुंबईत कुठेही पाणी तुंबल्याचे विधान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले होते. त्यांच्या या विधानवर चहुबाजूने टीका होत आहे. या पार्श्वभुमीवर आदित्य ठाकरे यांचे महापालिका या परिस्थितीत हतबल असल्याचे वक्तव्य येत आहे. 

या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले. अशी कुठली यंत्रणा असेल तर तुम्हीच मला सांगा, आपण मुंबईत आणू असेही ते म्हणाले. कलानगरला काही ठिकाणी खोदकामं सुरु असल्याने कलानगर आणि मातोश्रीच्या आसपास पाणी तुंबलं आहे. सगळेच मुंबईकर पावसात अडकले तसा मी ही अडकलो आहे. मुंबईत विविध ठिकाणी एका रात्रीत ४०० मिमी पेक्षा अधिक पाऊस लागल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

पाच लाखांची भरपाई 

पावसाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच मुंबई महापालिकेने देखील पाच लाखाची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मालाडमध्ये भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.