‘भाजपच्या विनंतीला एकदा मान दिला, पुन्हा-पुन्हा शक्य नाही!’ पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मनसेचा इशारा

Abhijit Panse:  दरवळेस असे चालणार नाही, असा इशारा मनसे नेत्याने दिलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 7, 2024, 04:58 PM IST
‘भाजपच्या विनंतीला एकदा मान दिला, पुन्हा-पुन्हा शक्य नाही!’ पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मनसेचा इशारा title=
Abhijit Panse

Abhijit Panse: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर पानसेंना माघार घेण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता. 

मनसेचा एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नव्हता. असे असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण पानसेंनी पदवीधर निवडणुकीची तयारी केली असताना त्यांना माघार घ्यायला लावणे हे नेटीझन्सना काही आवडलेले दिसत नाही. त्यांनी मनसेला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारायला सुरुवात केलीय. या पार्श्वभूमीवर मनसे अधिकृत पेजवर मनसे नेत्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

मनसे नेते शिरीष सावंत यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये दरवळेस असे चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. काय म्हणाले शिरीष सावंत? जाणून घेऊया. 

काय म्हणाले शिरीष सावंत?

भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे सावंत यांनी सांगितले. आगामी कोकण पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देऊ नये अशी विनंती त्यांनी केल्याचे सांगितले. 

त्यांच्याया विनंतीस मान देऊन पक्षाचे उमेदवार अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असे ते म्हणाले. दरम्यान, या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या विनंतीस मान देऊन हे पाऊल उचलेलं असलं तरी दरवेळेस हे शक्य होणार नाही हे निश्चित, असा इशाराही शिरीष सावंत यांनी दिलाय  

नाराज नेटिझन्सच्या प्रतिक्रिया 

या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतरांची मर्जी राखताना स्वतःचे नुकसान होतय. कार्यकर्त्यांच्या मनाचा विचार करावा अशी विनंती एकाने केली आहे. अभिजीत पानसे सर, तुम्ही अपक्ष उभे रहा. मनसे या पक्षामधून तुम्हाला कधीही आमदार होता येणार नाही, असा सल्ला त्यांना देण्यात आलाय. अजून किती काळ असं चालणार ? असा प्रश्नही विचारण्यात आलाय. 

पक्षाने निवडणुकाच लढवायच्या नाहीत, मग कार्यकर्त्यांनी मतदारांना किती गोष्टी सांगून खेळवत बसायचं? यातून मतदार  आणि कार्यकर्ते तुटत चालले आहेत. अशाप्रकारे पक्ष भाजपच्या दावणीला बांधणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया पोस्टवर येतेय. 

अभिजित पानसेंची प्रतिक्रिया 

उमेदवारी मागे घेतल्यानंतर मनसे नेते अभिजित पानसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे, राज ठाकरे बोलले उडी मारा की मारणार, ते बोलले थांबा तर थांबणार, असे पानसे म्हणाले आहेत. 

मी राज ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक आहे.  पदवीधर निवडणूक लढवणार होतो. पण देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत माघार घेण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक लढवत नाही, असे पानसे म्हणाले. दरम्यान निरंजन डावखरेंना त्यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनसे पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. निवडणुकीकरता माझी पूर्ण तयारी होती. या निवडणुकीत बिनशर्थ पाठिंबा द्यायचा की नाही, यावर निर्णय झालेला नाही, असेही ते पुढे म्हणाले.