मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळीच रंगत चढताना दिसत आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर वाग्बाण सोडले जात आहेत. आता यामध्ये राजकारणातील जनरेशन नेक्स्टही उतरली आहे. नव्या पिढीच्या या शिलेदारांकडून प्रथमच एकमेकांवर थेट टीका होताना दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. सुजात यांनी सोमवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आदित्य ठाकरे रस्त्यावर दिसत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुंबईत रस्त्यांची अवस्था वाईट असताना शिवसेना उत्तर प्रदेशातल्या राममंदिराबद्दल बोलत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी सेनेमुळेच होईल- प्रकाश आंबेडकर
त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि शिवसेनेकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
आदित्य ठाकरे यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले. यामुळे भाजपाच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा काल नवी मुंबईत दाखल झाली. यावेळी बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना बेलापूर विधानसभा शिवसेना लढवणार असल्याचे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले.
राष्ट्रवादीतून गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने ते बेलापूरमधून निवडणूक लढतील अशी चिन्हे होती. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे ऐरोली आणि बेलापूरमधून तिकीट नेमके कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.