अखेर ठरलं! उद्या आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा

आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यामुळे शिवसेना त्यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हती.

Updated: Sep 29, 2019, 09:40 PM IST
अखेर ठरलं! उद्या आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा title=

मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या महालक्ष्मी येथे होणाऱ्या मेळाव्यात शिवसेनेकडून याची अधिकृतपणे घोषणा केली जाईल. त्यामुळे या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. 

काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर वरळीचे आमदार सुनील शिंदे आणि इतर स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली होती. यामध्ये आदित्य यांना वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासंदर्भात अंतिम चाचपणी झाली होती. 

आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यामुळे शिवसेना त्यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हती. मात्र, मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणाऱ्या सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळीचा बालेकिल्ला आणखी भक्कम झाला आहे. त्यामुळे वरळीतून आदित्य यांना निवडणुकीच्या रिंगणातून उतरवण्यास कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या अनेक भागांमध्ये फिरले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी चांगलीच वातावरणनिर्मिती करण्यात सेनेला यश आले होते. मात्र, आता शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास आदित्य यांना वरळीत कितपत आव्हान निर्माण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, रविवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले. शिवसेनेकडून या उमेवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नसली तरी मुंबई, कोकण, कोल्हापूर आणि राज्यातील इतर भागातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तर काँग्रेसकडूनही आज संध्याकाळी ५१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नसीम खान, नितीन राऊत यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.