अम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी

काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.   

Updated: Jun 2, 2020, 08:56 AM IST
अम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.  जूनपर्यंत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत येऊ शकेल. भारतीय हवामान विभागाने दोन्ही राज्यांसाठी 'यलो' अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पावसाची शक्यताही आहे. मुंबई, कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हरिहरेश्वर, दमणसह कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा 'यलो' इशारा 

आयएमडीने उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर 'यलो' इशारा दिला. आयएमडीने इशारा दिला की चक्रीवादळ 'निसर्ग'चा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांवर होईल. तसेच  गुजरात आणि इतर शेजारच्या राज्यांपेक्षा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा वाढेल आणि चक्रीवादळाचा वेग आणखी तीव्र होईल आणि हे वादळ रायगड जिल्ह्यातील हरिहेश्वर ते दमण दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर ३ जूनला धडकेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज 

दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या १२ तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर पुढील २४ तासांत पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळाच्या वादळामध्ये तीव्रता वाढेल, असे हवामान विभागाने म्हटेल आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत निसर्ग चक्रीवादळाविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी शाह यांनी केंद्राकडून सर्व मदतीची ग्वाही दिली आणि राज्यांना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा व स्रोतांचा तपशील तयार करण्यास सांगितले. 

यापूर्वी अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या प्रकृतीचा सामना करण्यासाठी तत्परतेची व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह यांनी बैठक घेतली होती. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ), भारत हवामान विभाग (आयएमडी) च्या अधिकाऱ्यांसमवेत गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

एनडीआरएफने गुजरातमध्ये यापूर्वी  १३ टीम तैनात केल्या आहेत, त्यापैकी दोन टीम राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात १६ टीम तैनात करण्यात आल्या असून त्यापैकी सात टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली येथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. खालच्या किनारपट्टी भागातून लोकांना बाहेर काढण्यात एनडीआरएफ राज्य सरकारांना मदत करत आहे.