वादानंतर अखेर अग्रिमा जोशुआने मागितली माफी; वादग्रस्त व्हिडिओही हटवला

अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आक्षेप घेत मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली होती.  

Updated: Jul 11, 2020, 02:03 PM IST
वादानंतर अखेर अग्रिमा जोशुआने मागितली माफी; वादग्रस्त व्हिडिओही हटवला

मुंबई : अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आक्षेप घेत मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली होती. आता सर्वत्र संताप आणि चीड व्यक्त केली होती. आता राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर अग्निमाने हा वादग्रस्त व्हिडिओ हटवला असून तिने माफीही मागितली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तीव्र विरोधानंतर स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिच्या अडचणीत अधिक वाढ झाल्याचे दिसून येत होते. हा वाद अधिक विकोपाला पेटायच्या आधी तिने माफी मागत आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाकत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी 'झी २४ तास'ने आवाज उठवला होता.  

अग्रिमाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. एका स्टॅण्डअप शोदरम्यान जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.  हा वाद आपल्या अंगाशी येणार हे लक्षात आल्यानंतर तिने माफी मागितली आणि व्हिडिओही हटवला आहे.
 
शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवप्रेमी आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती. अनेक राजकीय पक्षांनीही तिच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती. समस्त शिवप्रेमींच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आहे. जोशुआने तिच्या ट्विटर अकाउंटवरुनही जाहीर माफी मागितली आहे.