मुंबई : राज्यात महायुतीला बहुमत असतानाही ते का सरकार स्थापन करत नाहीत, त्यांचं काय चाललंय माहित नाही. पण दुसरीकडे पोशिंदा शेतकरी अतिवृष्टीमुळे मोडून पडला आहे, शेतकरी मोडलाय, मदत नाही दिली, तर शेतकरी सरकारही मोडेल, अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदतीची गरज आहे, पिक विमा कंपन्यांकडून भरपाई मिळवून देण्याची देखील गरज आहे, शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीत आहे, त्याला मदत झाली नाही, तर कोणत्याही सरकारला राज्य करणे कठीण होईल. अजूनही हवामान खात्याने वादळाचा इशारा दिलेला आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे, राज्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे, पण यांना काहीही पडलेलं नाही, यांना सरकार आपलंच येईल का याविषयी पडलं आहे, पण काळजीवाहू सरकारने हालचाल करण्याची गरज असताना, काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्याची काही पडलेली नाही, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
तसेच केंद्राने देखील मदत देणे गरजेचे आहे, सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांना साडेसहा हजार कोटी रूपयांची मदत केंद्र सरकार करणार होतं, पण अजुनही त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही, तर ही मदत केव्हा मिळणार, तसेच मच्छीमारांनाही सतत वादळाचा धोका असल्याने मच्छीमारी करण्यात अडचणी येत आहेत, त्यांना देखील मदत देण्याची गरज असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.