Maharashtra Assembly : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची बहुमताने निवड झाली. राहुल नार्वेकर यांना 164 मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मंत मिळाली. राहुल नार्वेकर यांच्या विजयानंतर शिंदे गट आणि भाजपने एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करणारं भाषण केलं.
पण आज खऱ्या अर्थाने सभागृह गाजवलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी. अजित पवार यांनी आपल्या शैलीत भाषण करत शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांना शालजोडीतले टोले लगावले. अजित पवारांनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले महाराष्ट्राच्या विकासाची कामं गतिमान होतील अशी सभागृहाची अपेक्षा आहे, आपलं नाव जोडलं गेलं हा मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे. राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही, असं मिश्किल भाष्य अजित पवार यांनी केलं.
यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. पण एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं, काय आदित्य हो की नाही, असं सांगत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
आता विरोधी बाकावरुन पाहिलं तरी समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्तच पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं. पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. दिपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झाले आहेत, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.