सध्याची स्थिती 'थापाड्या'साठी योग्यच - अजित पवार

  'थापाड्या' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुंबईत अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

Updated: Oct 4, 2017, 11:12 PM IST
सध्याची स्थिती 'थापाड्या'साठी योग्यच - अजित पवार   title=

मुंबई :  'थापाड्या' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मुंबईत अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

'मी आयुष्यात पहिल्यांदाच चित्रपटाला मुहूर्ताचा क्लॅप दिला आणि तोही 'थापाड्या' नावाच्या चित्रपटाला... त्यामुळे काही लोकांच्या मनात प्रश्न येणे साहजिकच आहे. मात्र, गेल्या तीन साडे तीन वर्षांपासून आपण सगळेच बघतो आहोत की कशा प्रकारे थापा चाललेल्या असून लोकांना बनवण्याचे काम चालू आहे... कदाचित त्याच्यातूनच भाऊसाहेबांना 'थापाड्या' हे नाव सुचले असावं,' अशा शब्दांत दादांनी यावेळी भाजप सरकारला टोला हाणलाय.

मी जरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी मी त्या भूमिकेतून हे बोलत नसून आता सहनशीलतेचा अंत झाला आहे, असे मला वाटते. पण आता लोकांना जाणवू लागले आहे की हे फसवण्याचे काम चालू आहे त्यावेळेस मग कोणीही असले तरी लोक गप्प बसत नाहीत आणि म्हणूनच या चित्रपटाला 'थापाड्या' हे नाव समर्पक आहे, असा माझा कयास आहे' असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 

मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, भाऊसाहेब भोईर व शरद म्हस्के याची निर्मिती असलेला अजित शिरोळे दिग्दर्शित 'थापाड्या' या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मंगळवारी मुंबईत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताला आपली उपस्थिती का? याचं उत्तर दिलं. 

या प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, निर्माते भाऊसाहेब भोईर, शरद म्हस्के व इतर मान्यवर हजर होते.