२० तासानंतर अजित पवार अवतरले, शरद पवारांसोबत चर्चा सुरू

मागच्या काही तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार हे अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.

Updated: Sep 28, 2019, 01:16 PM IST
२० तासानंतर अजित पवार अवतरले, शरद पवारांसोबत चर्चा सुरू title=

मुंबई : मागच्या काही तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार हे अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतला शरद पवारांचा बंगला सिल्व्हर ओकमध्ये अजित पवार पोहोचले आहेत. काहीच वेळापूर्वी शरद पवारही पुण्याहून मुंबईला आले होते. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे बंधू श्रीनिवास पवारही उपस्थित आहेत. तर सिल्व्हर ओक बंगल्यात सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही आहेत. पण राजेंद्र पवार आणि रोहित पवार मात्र अनुपस्थित आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु झाली आहे.

काल संध्याकाळी अजित पवार यांनी अचानक त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर अजित पवार कोणाच्याही संपर्कात नव्हते. अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा का दिला हे राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्यांना माहिती नव्हतं. राजीनामा देताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशीही चर्चा केली नव्हती.

त्यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. मात्र, मी कुटुंब प्रमुख असल्याने मला याबाबतची माहिती जाणून घेण्याची माझी जबाबदारी होती. मीही माहीती घेतली. त्यांनी आपल्या कुटुंबातही चर्चा केली. तसेच माझे (काका) नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात आल्याने ते अस्वस्थ होते. अस्वस्थता आणि उद्विग्नेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असवा, अशी माहिती शरद पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिली.