मुंबई : म्यानातून उसळे तलवारीची पात...असं म्हणताना जरी जोश वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र म्यानातून बाहेर निघणाऱ्या या तलवारीची राज्यातील मंत्र्यानी धास्ती घेतल्याचंच चित्रं आहे.
भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंग यांचे नातू गुरज्योत किर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुरज्योत किर यांनी आदराने अजित पवारांना तलवार भेट देऊ केली आणि प्रथेप्रमाणे गुरूज्योत यांनी भेट म्हणून देण्यासाठी तलवार म्यानातून काढण्यासाठी हात पुढे केला आणि लगोलग अजित पवारांनी पुढे होऊन त्यांचा हात धरला आणि दुसरा हात कपाळावर मारून घेतला.
एवढंच नाही तर भेट स्विकारताना त्यांनी मास्क खाली काढून गुरूज्योत यांच्या कानाजवळ काही सांगितलं. तलवार मान्यातून काढून कशाला नसती आफत अंगावर घ्या.. असेच काहीसे त्यांचे हावभाव होते.
याआधी शूर वीराप्रमाणे भाजपचे मोहित कंबोज यांनी सार्वजनिक कार्यक्रमात तलवार झळकवली होती. तर एका कार्यक्रमात काँग्रेसच्या अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी सार्वजनिक कार्यक्रमात तलवारी झळकावल्या होत्या.या तिघांवरही मुंबई पोलीस आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हा इतिहास ताजा असल्यानंच वर्तमानाचं भान राखत अजित पवारांनी गुरूज्योतच्या उत्साहाला वेळीच रोखलं आणि पुढचा प्रसंग टाळला.