Maharashtra NCP Crisis: अजित पवार येत्या काळात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. अनेक तर्कवितर्क लावले गेले, सूत्रांच्या हवाल्यानं अनेक वृत्तही समोर आली. पण, या साऱ्या चर्चा खुद्द अजित पवार यांनी धुडकावून लावत या माहितीमध्ये काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
आपल्याविषयी सुरु असणाऱ्या सर्व चर्चा तथ्यहीन आहेत अशी EXCLUSIVE प्रतिक्रिया पवारांनी झी २४ तासशी संवाद साधताना दिली. प्रतिक्रिया त्यांनी दिली. नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य असं म्हणत बावनकुळेंनी आपल्या पक्षाविषयी का बोलावं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांकडे कटाक्ष टाकत, पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर आपल्याला वारंवार खुलासे करायचे नाहीत असंही यावेळी ते म्हणाले.
एकिकडे विधनभवनात असणाऱ्या कार्यालयात आपण नियमित कार्यालयीन कामांमध्ये व्यग्र असू असं ट्विट करत माहिती देणाऱ्या पवारांनी माध्यमांसमोर येत भाजपमध्ये जाणार नसल्याचं जवळपास स्पष्ट केलं. पण, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईत पोहोचले असून, काही मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहता पुढची चाल नेमकी काय असणार हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मंगळवारी मुंबईत असणार आहेत. पण, त्यांनीही अजित पवारांबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा फेटाळल्या. या केवळ वावड्या असल्याचं त्यांनी म्हटलं. शरद पवारांनी आज आमदारांची कोणतीही बैठक बोलावलेली नाही असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात इतक्या सर्व घडामोडी सुरु असतानाच आता अनेकांचं लक्ष मंगळवारी मुंबईतील इस्लाम जिमखान्यावर शरद पवार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीकडे लागलं आहे. या इफ्तार पार्टीला अजित पवार येणार का याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या इफ्तार पार्टीसाठी एनसीपीचे महत्त्वाच्या महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती असेल. त्यातच सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारही यादरम्यान मुंबईतच आहेत. सकाळी ते मुंबईत नियोजित भेटीगाठी घेतील, त्यानंतर मात्र ते या समारंभासाठी उपस्थित राहणार का हे काही तासांनी कळणारच आहे.