Ajit Pawar Will Join BJP Rumors: महाराष्ट्राच्या राजकाराणात शिंदे- फडणवीस सरकार येऊन मोठा काळ लोटत नाही, तोच पुन्हा एकदा राजकीय घाडमोडींना वेग आला आणि आता थेट राष्ट्रवादीला सुरुंग लागला असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार पक्ष सोडून भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचं म्हटलं गेलं. सूत्रांच्या हवाल्यातून मिळालेल्या माहितीच्या बळावर अनेक राजकीय विश्लेषकांनीही विश्लेषणाचा डोलारा उभा केला. यातच आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली. (Ajit Pawar Polotical update)
सध्याच्या घडीला ही राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समजली जात असून, महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आणखी एका राजकीय भूकंपाची साक्षीदार होऊ शकते याचीच चिन्हं सध्या पाहायला मिळत आहेत. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतून 53 पैकी 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे, तर या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्रही अजित पवारांच्या गटाकडे असल्याचं वृत्त सध्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
दरम्यान एकिकडे अजित पवार समर्थक आमदार मुंबईच्या दिशेनं निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरीही खुद्द अजितदादांचं ट्विट मात्र काही वेगळीच माहिती देताना दिसत आहे.
खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 17, 2023
आपण मंगळवारी आमदारांची बैठक बोलवल्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या, पण त्या पूर्णपणे असत्य असल्याचं ते या ट्विटमधून म्हणाले. 'मी मुंबईतच असून, मंगळवारी विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार आहे', अशी माहिती त्यांनी ट्विट करत देत कार्यालयाचं नियमित कामकाज सुरू राहणार असल्याचंही ते म्हणाले.
एकिकडे अजित पवार यांच्या ट्विटनं गोंधळाची परिस्थिती निर्माण केलेली असतानाच दुसरीकडे पवार समर्थक आमदारांचं मुंबईत येण्याचं नेमकं कारण कार? हा प्रश्नच उपस्थित होत आहे. राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेही मुंबईकडे येत असल्याची माहिती मिळत असून, त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. तिथे नाशिकचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवारसुद्धा मुंबईकडे रवाना झाले आहेत त्यामुळं मुंबईत नेमकी कोणती चाल खेळली जाणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे.