मुंबई : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता मुंबईत ही लवकरच नवा बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. मुंबईतील सर्व लोकल एसी करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्याची माहिती पुढे येत आहे. (AC local in Mumbai)
मुंबईतील सर्व लोकल एसी (AC Local) करण्यासाठी 20 हजार कोटींच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. याला केंद्रीय अर्थखात्याची लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील लोकल आणि रेल्वे मार्गाचे विस्तारीकरणावर देखील काम होणार आहे. मुंबईत लोकलमधून अनेक जण दरवाजाला लटकून प्रवास करतात. पण मुंबईतील एसी लोकल झाल्यानंतर स्वयंचलित दरवाजे असल्याने यामुळे लोकलमधून पडून अपघात होण्याच्या घटना कमी होण्यात मदत होईल.
आगामी काळात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्याआधी मुंबईसह उपनगरातील नागरिकांना मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
याआधी एसीच्या तिकीटदरांमध्ये निम्म्याने घट करण्यात आली होती. त्यानंतर एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे.
दुसरीकडे उरणमध्ये लोकलचे विस्तारीकरणानंतर 2 महिन्यात लोकल सुरु करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. 90 टक्के काम झालं असून उर्वरीत काम लवकरात पूर्ण करण्यात येणार आहे.