राज ठाकरे राजकीय बैठकांपासून दूर मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांचा मुंबईत बैठकांचा धडाका

राज ठाकरे हे सध्या राजकीय वर्तुळात कमी आणि घरी जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. 

Updated: Jun 16, 2022, 03:00 PM IST
राज ठाकरे राजकीय बैठकांपासून दूर मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांचा मुंबईत बैठकांचा धडाका title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबात बऱ्याच हालचाली सुरु आहेत. अर्थातच आगामी निवडणुका हे सुद्धा यामागचं कारण आहे. पण, आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ज्यामुळं पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राजकीय वर्तुळात कमी आणि घरी जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. 

राज ठाकरे सध्या राजकीय बैठकांपासून दूर असतानाच त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी मात्र मुंबईत बैठकांचा धडाका लावला आहे. पायावरील शस्त्रक्रियेमुळं सध्या राज ठाकरे काही दिवस राजकारणातून विश्रांती घेताना दिसत आहेत. 

मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या चांगलेच सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राजगड या पक्ष कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याची जबाबदारी देण्यात आली. 

सोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या बांधणीच्या दृष्टीनेही पाहणी करण्यास सांगितले होते. मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर अमित ठाकरे स्वतःसुद्धा महाराष्ट्र दौरा करणार आहेत

सध्या अमित ठाकरे यांनी मुंबई कडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून मुंबईतल्या वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी, युवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.