दीपक भातुसे, झी २४ तास,मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये तरूण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचेही सांगण्यात येते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीकडून मुंबईची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांना अस्मान दाखवले होते. निवडणूक प्रचारावेळी विशेषत: तरुण वर्गात त्यांचा मोठा बोलबाला दिसून आला होता.
त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद सोपवण्याचा विचार पक्षाकडून केला जात आहे. मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच ही मागणी केली. मुंबईत अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. ऐतिहासिक भूमिकेमुळे त्यांचा घराघरात पोहोचलेला चेहरा आणि तरुण वर्गामध्ये त्यांच्याविषयी असलेले आकर्षण पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा अनेकांचा होरा आहे.
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन सोहळ्यातही शरद पवार यांनी शहरी भागांमध्ये पक्षाचा विस्तार करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार वाढवायला पाहिजे. राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण झाला आहे, ही बाब खरी आहे. त्यामध्ये काही चूक नाही. मात्र, ५० टक्के लोक शहरात राहतात. प्रत्येक तालुक्याचेही नागरीकरण झाले आहे. याकडे दुर्लक्ष करून आपल्याला संपूर्ण राज्यात यशस्वी होता येणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते.
२० वर्षांपूर्वी पक्ष स्थापनेनंतर सत्तेत आलो तेव्हा अनेक तरुणांना संधी दिली, ते पहिल्यांदा मंत्री झाले. सर्व फळी तरुणांची होती. यामुळे पक्षाचा विस्तार होण्यास मदत झाली. आताही विचार करायला पाहिजे की, आता संघटनेच्या ठिकाणी किती नवीन फळी आहे? मला या गोष्टीची काळजी वाटते. त्यामुळे संघटनेतील चेहरे बदलून जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.