मुंबई: रावण दहनाच्यावेळी अमृतसरमध्ये झालेल्या अपघाताने रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत. मुंबईतही काही ठिकाणी अशी परिस्थिती ओढवू शकते. हार्बर मार्गावरील वडाळा आणि गुरु तेगबहाद्दूर नगर स्थानकांदरम्यान अनेक झोपडपट्ट्या रेल्वे रुळाला खेटून आहेत.
या झोपडपट्टीमधील अनेक समारंभासाठी रुळांलगतच्या जागेचा वापर केला जातो. नवरात्रामध्येही अनेक मंडप रुळांना खेटून उभारण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात याठिकाणी अमृतसरसारखी भीषण दुर्घटना होऊ शकते, अशी अनेकांची तक्रार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक याठिकाणी संरक्षक भिंत घालण्याची मागणी करत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता अमृतसरमधील दुर्घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल, अशी आशा नागरिकांना आहे.