मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पुन्हा एकादा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांचे सेल्फीप्रेम यासाठी निमित्त ठरले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन स्थळांवर सेल्फी काढताना दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात. मात्र, मुंबई-गोवा क्रुझच्या उद्घाटन कार्यक्रमात अमृता फडणवीसांनीच या नियमाला हरताळ फासला.
यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतला. या प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत अंगरक्षक आणि पोलीस अमृता फडणवीस यांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अमृता फडणवीस सेल्फी काढण्यात मग्न असलेल्या दिसत आहेत. साहजिकच यावरून वाद निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवेचे शनिवारी उद्घाटन झाले. भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या क्रुझला केंद्रीय बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला.