सुशांत आत्महत्या : अंकिता लोखंडेने अशी केली बिहार पोलिसांची मदत

 अंकिताच्या घरापासून हे ठिकाणं तीन किलोमीटर अंतरावर 

Updated: Aug 4, 2020, 11:27 AM IST
सुशांत आत्महत्या : अंकिता लोखंडेने अशी केली बिहार पोलिसांची मदत  title=

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस संबंधितांकडे चौकशी करत आहेत. दरम्यान पटणामध्ये सुशांतच्या वडीलांनी रिया विरोधात तक्रार केली. यानंतर बिहार पोलीस चौकशीसाठी मुंबईत आले. यानंतर अंकिता लोखंडेकडून देखील बिहार पोलिसांनी माहीती घेतली. यावेळी अंकिता पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावली. बिहार पोलिसांची टीम मुंबईतील मालाडमध्ये एका ठिकाणी थांबली होती. अंकिताच्या घरापासून हे ठिकाणं तीन किलोमीटर अंतरावर होतं. 

कोरोना प्रादुर्भामुळे मुंबईतील रस्त्यांवर टॅक्सी, रिक्षा फारश्या दिसत नाहीयत. अशावेळी मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना वाहनाचे सहकार्य न मिळाल्याचे सांगण्यात येतंय. बिहार पोलिसांना अंकिताच्या घरी जाण्यासाठी ३ किलोमीटर पायी चालत जावे लागल्याचे वृत्त आहे. साधारण तासभर यांच्यात चर्चा झाली. पुन्हा पोलिसांना पायपीट करावी लागू नये म्हणून अंकिताने आपली जॅगुआर पोलिसांना दिली. 

सुशांतच्या वडीलांनी रिया चक्रवर्तीवर केलेल्या आरोपामुळे प्रकरण आणखी वाढलं. रियाविरोधात अनेक गोष्टी पुढे आल्या. पण रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी नुकतेच यावर स्पष्टीकरण दिले. 

दरम्यान रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलंय. त्यानुसार १४ जून २०२० ला रिया मुंबईतच होती. तिला सुशांतच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची परवानगी नव्हती. कारण २० जणांच्या यादीत तिचं नाव नव्हतं. तिला मुंबई पोलिसांनी १८ जूनला वांद्रे पोलीस स्थानकात बोलवलं. तिथे तिचे स्टेटमेंट लिहून घेण्यात आलं. यानंतर १८ जुलैला सांताक्रूझ पोलीस स्थानकात तिला हजर राहण्यास सांगितलं.  तिथे देखील तिने आपलं स्टेटमेंट दिलं. 

बिहार पोलीस पटणामध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे मुंबईत तपासासाठी आली. तेव्हा रियाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. कायदेशीररित्या ही केस मुंबई पोलिसांच्या अख्त्यारित आहे. बिहार पोलिसांकडे याचा तपास करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे रियाने आपल्या वकिलास सांगितले.

ईडीने गेल्या आठवड्यात बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी झाली. एफआयआरमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी आरोप केला आहे की, रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत बिहार पोलीसांचं पथक या प्रकरणाच्या तपासासाठी दाखल झालं. पण सुशांतच्या अकाऊंटमधून रिया किंवा तिच्या भावाच्या खात्यात एक रुपयाही आला नसल्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलंय. 

सुशात सिंह राजपूतशी संबंधित दोन कंपन्या आणि रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शोविक यांचा समावेश असलेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणांवरही ईडीची नजर आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ज्यांची नावं आहेत अशा आरोपींविरुद्ध ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. यात रिया चक्रवर्ती, तिचं कुटुंब आणि इतर सहा नावं आहेत. मुंबई पोलीस तसंच बिहार पोलिसांकडूनही सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरु आहे. पोलीस तपासातून दररोज अनेक नव्या गोष्टी समोर आहेत.