आर्यन खानच्या अडचणी वाढणार? हिंदू महासंघाची कोर्टात धाव

Aryan Khan : काही दिवसांपूर्वी आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट मिळाली होती. पण आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

Updated: Dec 5, 2022, 05:27 PM IST
आर्यन खानच्या अडचणी वाढणार? हिंदू महासंघाची कोर्टात धाव title=

Aryan Khan : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणात (cruise drug case) काही दिवसांपूर्वी क्लीन चिट दिली होती. एनसीबीने (NCB) आर्यन खानसह 6 जणांची नावं आरोपपत्रातून वगळली होती. या प्रकरणात आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. न्यायालयाने अनेक सुनावण्यानंतर आर्यन खानला जामीन दिला होता. त्यानंतर या प्रकरणात आर्यन खानला एनसीबीनं क्लिन चीट दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

क्रुझ ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खान यांचं नाव वगळण्यात आल्याच्या विरोधात हिंदू महासंघानं (hindu mahasangh) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खानला एनसीबीकडून क्लीन चीट देण्यात आली आल्यामुळे हिंगू महासंघाने कोर्टात धाव घेतली आहे. एका जनहित याचिकेच्या माध्यमातून आर्यन खानच्या जामिनाला आव्हान देण्यात आले आहे. तपास यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाचा नव्यानं तपास करण्याची मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केलीय. तसेच उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून लवकरच सुनावणी होणार असल्याचा दावा संघटनेच्या वकिलांनी केला आहे.

वकिलांचा दावा काय आहे?

या प्रकरणात पोलिसांकडे पुरावे उपलब्ध आहेत की नाही? ते न्यायालयात टिकणार की नाही ? ही बाब ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र, आरोपींना निर्दोष मुक्त ठरवून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले आहे. एखाद्या आरोपीला गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. मात्र, याप्रकरणात पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई झाली नाही. कोणत्या दबावातून आर्यनला या प्रकरणातून वगळले हे समोर यायला हवं असे, हिंदू महासंघाच्या वकिलांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

एनसीबीने गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवर आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर एनसीबीने क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला अटक केली होती. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.