इंदिरा गांधींनी भेट दिलेल्या मुंबईतल्या 'गरीबी हटाव नगरा'ची आजची स्थिती

'गरीबी हटाव नगरा'तून ना गरिबी हटली... उलट वाढलीच... आणि समस्याही वाढल्या!

Updated: Oct 19, 2019, 11:20 PM IST
इंदिरा गांधींनी भेट दिलेल्या मुंबईतल्या 'गरीबी हटाव नगरा'ची आजची स्थिती    title=

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : भारतीय राजकारणात इंदिरा गांधींनी दिलेली 'गरीबी हटाव' घोषणा अजरामर ठरली. याच घोषणेवरून मुंबईतल्या पवईजवळ 'गरीबी हटाव नगर' ४० वर्षांपूर्वी वसवण्यात आलं... पण ना गरिबी हटली... उलट वाढलीच... आणि समस्याही वाढल्या! इंदिरा गांधींनी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी ७० च्या दशकात 'गरीबी हटाव'चा नारा दिला होता. हा नारा प्रचंड गाजत असलताना १९८२ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आयआयटी पवईला आल्या होत्या. इंदिरा गांधींची सभा झाल्यानंतर इथल्या वस्तीला 'गरीबी हटाव नगर' असं नाव दिलं गेलं. तेव्हा दीडशे घरांची संख्या आता साडे चारशे झालीय. मतदान ओळखपत्रावर अजूनही गरीबी हटाव नगर असाच पत्ता आहे. गरीबी हटाव नगर नाव ठेवलं परंतु गरीबी हटणं दूरच उलट समस्या वाढल्यात, असं इथले रहिवासी सांगत आहेत.  

अपुरा पाणीपुरवठा, तुटलेल्या गटारी, शौचालयाची दुरवस्था, उखडलेला रस्ता, प्रचंड अस्वच्छता या समस्या इथं पाचवीला पुजलेल्या आहेत. 

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या आणि गरिबी हटावच्या केवळ चर्चा होतात, पण पुढं काहीच होत नाही. त्यामुळं गरीबी हटाव नगरच नव्हे तर संपूर्ण देशच अजूनही गरीबी हटावची वाट पाहतोय.