मुंबई : प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आज दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सध्या डी एस कुलकर्णी अडकले आहेत.
अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांनी पुणे विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी बुधवारी तो फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कुलकर्णी दाम्पत्याच्या वतीनं अॅड. श्रीकांत शिवदे, अॅड. गिरीष कुलकर्णी आणि अॅड. सुशीलकुमार पिसे यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर कुलकर्णी दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला.
ठेवीदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १ हजार ३४०हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा, डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर दाखल करण्यात आला आहे.