बाप्पा येतोय; मात्र गणेशोत्सव मंडळं अजून परवानगीच्या प्रतीक्षेत

सध्या 227 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे

Updated: Aug 22, 2021, 10:08 AM IST
बाप्पा येतोय; मात्र गणेशोत्सव मंडळं अजून परवानगीच्या प्रतीक्षेत title=

मुंबई : गणेशोत्सवासाठी 1152 अर्ज, आतापर्यंत 227 मंडळांना परवाना, परवानगी अर्जांना अजूनही थंडा प्रतिसाद दिसून येत आहे. मंडळांकडून परवान्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जांना फारसा चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं नाहीये. 20 ऑगस्टपर्यंत मुंबई महानगर पालिकेकडून 1152 अर्ज आलेले आहेत.

दरम्यान या 1152 अर्जांमध्ये सध्या 227 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 721 अर्ज प्रक्रियेमध्ये असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. 

मुंबईत सुमारे 11 हजार गणेशोत्सव मंडळं आहेत. यामधील सुमारे 3500 मंडळ सणामध्ये मंडप बांधून उत्सव साजरा करतात. या सर्व मंडळांना पालिकेची परवानगी घेऊन उत्सव साजरा करावा लागतो. मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आल्याचं चित्र दिसतंय. मात्र तरी देखील तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही कोरोना खबरदारी घेऊनच उत्सव साजरे करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत. 

पालिकेच्या निर्देशामुळे मोठ्या जल्लोषात साजऱ्या करण्यात येणाऱ्या उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. गणेशोत्सवांमध्ये मुंबई पालिकेकडे परवानगीसाठी आलेल्या अर्जांपैकी आतापर्यंत 22.06 टक्के परवानगी देण्यात आली आहे. तर 7.87 टक्के अर्ज हे विविध अटींची पूर्तता करत नसल्यामुळे नाकारण्यात आलेत. पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 70.07 टक्के अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत.

ऑनलाइन परवानगी

गणेशोत्सव मंडळांना पालिकेने या वर्षी 21 जुलैपर्यंत ऑफलाईन परवानगी मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तर सध्याच्या स्थितीत ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज करण्यात येतायत. कोरोनामुळे या वर्षी मंडळांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

मुंबई महापालिकेने मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू केली आहे. दरवर्षी मंडळांना अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागत होतं, मात्र यंदाच्या वर्षी परवानगी घेण्याची गरज नसून गेल्या वर्षीच्याच आधारावर परवानगी देण्यात येतेय.