डबल डेकर बस मुंबईतून नामशेष होणार ?

सध्या मुंबईत असणाऱ्या 120 डबल डेकर बसपैकी 72 बसेस स्क्रॅप करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.

Updated: Dec 9, 2019, 05:55 PM IST
डबल डेकर बस मुंबईतून नामशेष होणार ? title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : सध्या मुंबईत असणाऱ्या 120 डबल डेकर बसपैकी 72 बसेस स्क्रॅप करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर उर्वरित डबल डेकर बस ही कमी केल्या जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सेवेत असणारी डबल डेकर बस हळूहळू नामशेष होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डबल डेकर बस ही मुंबईची ओळख आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या डबल डेकर बसमधून प्रवास करणे सगळ्यांच्याच आवडीचा भाग राहीला आहे. अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात या डबल डेकर बस आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील लोक मुंबईत आल्या नंतर त्यांना या डबल डेकर बसचे अप्रूप वाटते. स्वातंत्र्य पूर्व काळापासून या डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र देखभाल करण्याचा खर्च परवडत नसल्याने आता या डबल डेकर बस बेस्ट मार्फत हळूहळू कमी केल्या जात आहेत.

मुंबईची ओळख असणाऱ्या या डबल डेकर बेस्ट बसेस बंद होऊ नयेत, मुंबईची ही ओळख पुसली जाऊ नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन डबल डेकर बस वाचावी यासाठी पुढाकार घेतला आहे. आता 120 पैकी 72 बसेस स्क्रॅप केल्या जातील. त्यानंतर उरलेल्या 48 डबल डेकर बस हळूहळू बंद होतील अशी भीती सामाजिक कार्यकर्ते इरफान माचीसवाला यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते बेस्ट प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.

या सगळ्या बाबत बेस्ट अध्यक्ष यांना विचारणा केली असता नवीन मेट्रो मार्ग, उड्डाण पुलामुळे काही डबल डेकर बस कमी केल्या जात आहेत. पण त्या पूर्णतः बंद केल्या जाणार नाहीत अस सांगण्यात आले.

मुंबईची ओळख सांगणाऱ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यापैकी डबल डेकर बस ही एक आहे मात्र गेल्या काही वर्षात ज्या गतीने डबल डेकर बस कमी होत आहेत. हे पाहता येत्या काही वर्षात त्या फक्त चित्रात दिसतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबईची ही ओळख कायमस्वरूपी पुसली जाऊ नये हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.