मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथ घेऊन आणि महाविकासआघाडीचं सरकार येऊन बारा दिवस उलटून गेले. पण अजूनही खातेवाटपाचा पत्ता नाही. लवकरच होईल याशिवाय कुठलंही उत्तर महाविकासआघाडीकडे नाही. महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचं घोडं अडलंय ते गृह आणि नगरविकासच्या मुद्द्यावरुन. राष्ट्रवादीला गृहखातं किंवा नगरविकास खातं हवंय पण शिवसेना ते सोडायला तयार नाही.
यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विभागवार चर्चा आणि प्रश्नोत्तराचा तास नसेल, असं सांगण्यात आलं आहे. ठाकरे सरकारनंही सत्तेवर आल्यापासून स्थगिती आणि आढाव्यापलीकडे काही केलं नाही. त्यामुळे भाजपकडून ही सरकारवर टीका होऊ लागली आहे.
मंत्री आहेत पण खाती नाहीत, दालनं आहेत पण कामं नाहीत. अशी परिस्थिती आहे. खातेवाटपाचा पत्ता नाही पण बंगल्यांचं वाटप मात्र तातडीनं झालं. सरकार काम करायला सुरुवात करणार तरी कधी हा नोकरशाहीबरोबरच जनतेचाही प्रश्न आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खातेवाटापाचा निर्णय घेतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खातेवाटप होईल अशी शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात खाटेवाटप कधी होईल याबाबत जनता वाट पाहत आहे.