केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, भास्कर जाधव म्हणतात, आता वेळ आली आहे...

तपास यंत्रणा भाजपसाठी काम करत असल्याचा भास्कर जाधव यांनी आरोप केला आहे

Updated: Oct 19, 2021, 03:33 PM IST
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, भास्कर जाधव म्हणतात, आता वेळ आली आहे... title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री सध्या इडी, सीबीआय, आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यावर बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सर्व मंत्र्यांनी आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत असा आरोप केला आहे.

महाविकास आघाडीतल्या सर्वच नेत्यांनी आणि त्याचबरोबर या राज्यातील जी काही विचारवंत लोकं आहेत, उद्योगक्षेत्रातील लोकं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं आहेत, या सर्वांनी बोललं पाहिजे, या संजय राऊत यांच्या विधानाशी आपण शंभर टक्के सहमत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत, ज्या यंत्रणांचं स्वतंत्र्य अस्तित्व असतं, पण आज भाजपाचा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता तारखा देतोय, वार देतोय, वेळ देतोय, कुणावर कधी रेड होणार ते सांगतोय, किती रुपायांची होणार आहे ते सांगतोय, याचा अर्थ असा या यंत्रणा भाजपसाठी काम करत आहेत का? असा संशय निर्माण झालेला आहे. 

नांदेडला पोटनिवडणूक लागली आहे. त्याठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करतील, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे. 

2014 पूर्वीची भाजपची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की हे डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येक वेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची 'कुठे नेवून ठेवला आहे भारत माझा' असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला आहे. 

राज्यात कुठलीही घटना घडली तरी प्रवीण दरेकर स्टुडिओ मध्ये बसलेले दिसतात. याचा अर्थ असा होता की एकतर ते स्टुडिओ मध्ये जाऊन बसलेले असतात किंवा मीडियाचे लोकं त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवीण दरेकर उपलब्ध असतात, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.