अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड आणि भारतातून फरार सुरेश पुजारीला अटक

 फिलिपिन्सच्या पॅरानॅक सिटीतून सुरेश पुजारीला अटक 

Updated: Oct 19, 2021, 02:14 PM IST
 अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड आणि भारतातून फरार सुरेश पुजारीला अटक

मुंबई :  अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड आणि भारतातून फरार सुरेश पुजारीला अटक करण्यात आली आहे. एफबीआयच्या इनपुटस् नंतर सुरेश पुजारीला अटक करण्यात आलं आहे. फिलिपिन्सच्या पॅरानॅक सिटीत त्याला अटक केली आहे, वर्तमानपत्रात जाहिरात देणारे हॉटेलमालक, बिझनेसमन यांना पुजारी टार्गेट करायचा. २०१८मधील भिवंडी फायरिंग प्रकरणात ठाणे खंडणीवरोधी पथकाने दाखल केलेल्या प्रकरणात पुजारीचं एफआयरमध्ये नाव आहे.

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी एनबीटीला या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारला यासंदर्भात फिलीपिन्सकडून माहिती देण्यात आली आहे. आता त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेव्हा पुजारी तिथल्या एका इमारतीबाहेर उभा होता, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्याला गाठलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला 15 ऑक्टोबर रोजी पकडण्यात आले. मुंबई पोलीस, सीबीआय व्यतिरिक्त तो एफबीआयच्या रडारवर होता.

सुरेश पुजारी यापूर्वी डॉन रवी पुजारीसोबत काम करत होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याने रवी पुजारीपासून वेगळे होऊन स्वतःची टोळी तयार केली होती. खंडणीकरता तो नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांना नियमित कॉल करत असे. ज्यांनी खंडणी जमा केली नाही त्यांच्यावर तो गोळ्या झाडत असे. वर्ष 2018 मध्ये, त्याच्या शूटरने कल्याण-भिवंडी महामार्गावर के. एन. पार्क हॉटेलला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. रिसेप्शनवर बसलेल्या कर्मचाऱ्यालाही गोळी लागली होती.

सुरेश पुजारी मूळचा उल्लासनगरचा आहे. 2007 साली तो भारतातून पळून गेला. सुरेश पुजारी हे नाव न लावता तो सुरेश पुरी आणि सतीश पै यांच्या नावाखाली वेगवेगळ्या देशांमध्ये राहत होता. त्याचे या नावांनी बनावट पासपोर्टही मिळाले होते.