मुंबई : भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. युती टिकविण्यासाठी भाजपकडून काहीही हालचाल करण्यात आली, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, सर्व आमदारांनी या बैठकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरवण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदारांचा मुंबईतील ललित हॉटेलातच मुक्काम असणार आहे.
भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला. एनडीएतून बाहेर काढले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत केला. दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ५०-५० च्या फॉर्म्युलाबाबत खोटे विधान केले, असे उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले. तर आमदारांनी पुढील मुख्यमंत्री कोण असावा, यावरही भाष्य केले. शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आमदारांची उद्धव ठाकरेंच्या नंतर एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हे उद्धव ठाकरेच घेतील आणि सर्व सेनेचे आमदार हे मुंबईतच राहणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांनी दिली. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीनंतर सेना आमदारांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले. तर मंत्रिपदांबाबत अजून निर्णय झाला नसल्यांचही ते म्हणाले.
तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सद्य परिस्थितीबाबत विचारलं असता आपल्याला याबाबत काहीही माहित नाही असं ते म्हणालेयत. तर भाजप विरोधीपक्षात बसणार का याबाबत त्यांनी बोलायला नकार दिलाय. आपण प्रवासात असल्यानं काहीच कल्पना नाही असं ते म्हणाले. ते सध्या सांगलीत दौरा करत आहेत. त्यावेळी ते बोलत होते.