मुंबई : गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असं वातावरण निर्माण करून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद झाली. पण संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चूहा' असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे.
नुसते आरोप करण्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपासी यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरण निर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसला, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
संजय राऊतांच्या बहुचर्चित पत्रकार परिषदेत निशाण्यावर होते ते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
तर पीएमसी घोटाळ्यातला आरोपी राकेश वाधवान हा किरीट सोमय्यांचा मुलगा नील वाधवानचा पार्टनर असल्याचा आरोपही राऊतांनी केला. किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना अटक करण्याची मागणीही राऊतांनी केली. त्याचबरोबर हिंमत असेल तर ईडीनं अटक करावी, असं आव्हानही राऊतांनी दिलं.
आपण ईडीला 3 पत्रं लिहिली, मात्र त्यावर कारवाई केली नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. सोमय्यांच्या सांगण्यावरून ईडी छापे टाकत असल्याचंही ते म्हणाले.