मुंबईत खड्ड्यांचा झोल, मुंबई महापालिकेवर भाजपचे गंभीर आरोप

वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत खड्डे लपवण्याचा झोल अशी टीकाही भाजपने केली आहे

Updated: Sep 27, 2021, 04:19 PM IST
मुंबईत खड्ड्यांचा झोल, मुंबई महापालिकेवर भाजपचे गंभीर आरोप

मुंबई : मुंबईतल्या खड्ड्यांवरून (Mumbai Potholes) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Corporation) जोरदार टीका केली आहे. संपूर्ण मुंबईत खड्ड्यांचा झोल असून, 927 खड्डे बुजवायला 48 कोटींचा खर्च केल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे. सगळ्या सोयी फक्त वरळीत (Worli) दिल्या जात असल्याचं म्हणत वरळीत थ्री डी मॅपिंगचा ढोल वाजवला जात असल्याची टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केली आहे. वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल, आणि संपूर्ण मुंबईत खड्डे लपवण्याचा झोल अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. 

प्रत्येक गोष्टीत वरळीला प्राधान्य

मुंबईत फुटपाथला रेलिंग द्यायची असेल तर वरळी, ट्रॅफिकचे अद्ययावत दिवे द्यायचे असतील तर वरळी, ब्रिज आणि पुलाच्या खाली सुशोभिकरण करायचं असेल तर वरळी आता थ्रीडी मॅपिंग करायचं आहे तेही वरळी, लहान मुलांसाठी कोविड सेंटर बनवायचं आहे तर वरळी, वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेना आणि महापौर यांना मान्य आहे का असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई मनपाची बनवाबनवी

मुंबई महानगरपालिका रोज हसवणुकीची स्पर्धा घ्यावी अशा पद्धतीची माहिती समोर आणत आहे. महापालिकेच्या पोर्टलवर (BMC Portal) खड्ड्यांसाठी ट्रॅकिंग सिस्टिम आहे. या ट्रॅकिंग सिस्टिमनुसार महापिलकेचं असं म्हणणं आहे की संपूर्ण मुंबईत फक्त 927 खड्डे आहेत, या पेक्षा हास्यास्पद प्रकार काय असेल असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. खड्डे आणि थ्रीडी मॅपिंगच्या बाबतीत बनवाबनवी सुरु असून येणाऱ्या काळात हे एक्स्पोज करु असा इशारा शेलार यांनी दिला आहे. 

मुंबईचं संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यासमोर असतं का? मुंबईच्या विकासाचा नकाशा कधी पाहता का? असा सवाल आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारला आहे.

ते कंत्राटदार कोण?

सचिन वाझे याने कोर्टासमोर एक स्टेटमेंट केलं होतं, त्यात मुंबई मनपाच्या कंत्राटदारांच्या चौकशीचं काम तुम्ही करा आणि त्यात काहीतरी मिळवून द्या असं राज्याच्या एका मंत्र्याने म्हटल्याचं सचिन वाझेने म्हटलं आहे. गेल्या वीस वर्षात रस्त्यांसाठी 21 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आणि यावर्षी मुंबईसाठी 48 कोटी रुपये फक्त खड्डे बुझवायला करण्यात आला आहे. म्हणजे 927 खड्डे बुझवायला 48 कोटी खर्च करण्यात आला, ही लुटालूट सुरु आहे. मुंबई मनपाचा खड्डे बुझवायचा दर हा राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या दरापेक्षा जास्त आहे. या खड्डे घोटाळ्यात कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्यात मिलीभगत आहे याची चौकशी सुरु आहे आणि योग्यवेळेला त्याचे निष्कर्ष बाहेर येतील असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.