मुंबई : Nitesh Rane supports Governor Bhagat Singh Koshari : राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचे पडसाद दिसताना दिसत आहेत. राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विधानाशी सहमत नाही, असे सांगत केवळ नापसंती व्यक्त केली. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे आणि बबनराव पाचपुते यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन केले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. कोश्यारींच्या विधानाची निषेध केला असून त्यांच्यावर कडक भाषेत टीकाही केली आहे. असे असताना भाजप नेते नितेश राणे यांनी मात्र कोश्यारींच्या विधानाचे समर्थन केले आहे. उलट त्यांनी कोश्यारींना विरोध करणाऱ्यांना त्यांनी सुनावले आहे.
एकीकडे राज्यपालांच्या वक्तव्यावरुन संतापाची लाट असताना नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांची पाठराखण केली. राज्यपालांनी कोणाचाही अपमान केलेला नाही, असं राणे यांनी म्हटले आहे. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचवेळी राणे यांच्या या ट्विटवरुन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी नितेश राणेंचा खरपूस समाचार घेतला आहे.
दरम्यान, मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलाय. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका असं राज ठाकरे म्हणाले. राज्याच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका असं राज ठाकरेंनी सुनावलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले की, मुंबईतून गुजराती, राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिल ? मुंबई आर्थिक राजधानी कशी राहिल ? गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं.