मुंबई : भाजप कोर कमिटीची बैठक 5 वाजता होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर ही बैठक होणार आहे. फडणवीसांसह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उपस्थित असणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी हालचालींना वेग आलाय. सागर निवासस्थानी बैठका सुरू झाल्या आहेत. आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, नीतेश राणे, राणा जगजितसिह पाटील, कृपाशंकर सिंह, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड सागर बंगल्यावर दाखल झालेत. भाजपच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार आहे.
दुसरीकडे भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप देखील अॅक्शनमोडमध्ये आली आहे.
सुप्रीम कोर्टानं मविआ सरकारला मोठा झटका दिलाय. उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी बजावलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिलीय. तसंच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभूंसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीशीला पुढील पाच दिवसांत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे.