काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग भाजपनेच दाखवला - उद्धव

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग आम्हाला भाजपनेच दाखवला, असा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे. 

Updated: Nov 12, 2019, 11:42 PM IST
काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग भाजपनेच दाखवला - उद्धव

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग आम्हाला भाजपनेच दाखवला, असा पलटवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. पुढच्या सहा महिन्यात आघाडीसोबत सरकार बनवणार असल्याचे स्पष्ट करत भाजपबरोबर काडीमोड झाल्याचे संकेत दिले आहेत. काहीही झालं तरी शिवसेनेचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल असे सांगत राजकारणाची नवी दिशा सुरू झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सत्तेची नवी समिकरणे पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, काल आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना भेटून हीच विनंती केली होती की आम्ही सरकार बनवू इच्छितो, तो दावा आमचा आजही कायम आहे, असे ते म्हणालेत.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही एकत्र बसू आणि मग समान कार्यक्रमावर विचार करून आम्ही सरकार बनविण्यासाठीचा आमचा दावा कायम आहे तो पुढे नेऊ. दरम्यान, परवा भाजपने जेव्हा असमर्थता दाखवली तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी मित्र मानला नाही तरी आम्ही त्यांना मित्र मानत आहे आणि मित्राने आम्हाला दिशा दाखवली असेल तर त्या दिशेने न जाणे हे मित्रत्वाला कलंक लागणारे आहे, असा जोरदार टोला चंद्रकांत पाटील यांना उद्धव यांनी हाणला.

एक नवीन सुरुवात करायची असेल तर काही मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे काही मुद्दे माझ्याकडे पण आहेत. हे सगळे एकत्र करून आम्ही मार्ग काढू. या विचारधारा कोणत्या संगमावर एकत्र आल्या ही सगळी माहिती मी मागवली आहे. आणि ही माहिती एकत्र केल्यानंतर आम्ही भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येऊ हे आमचे आम्ही ठरवू, असे उद्धव म्हणालेत.