२०२४ साली भाजप स्वबळावर सत्तेत येईल - फडणवीस

शिवसेनेच्या नेत्या आशाताई बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

Updated: Aug 19, 2021, 02:26 PM IST
२०२४ साली भाजप स्वबळावर सत्तेत येईल - फडणवीस title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर त्यावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्याने भाजपला ही संधी आहे. जसा तुमचा श्वास कोंडत होता तसा आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता. आता तीन पक्ष एकत्र आलेत आता श्वास त्यांचा कोंडतोय'.

'युती असल्याने तेव्हा पक्ष वाढीसाठी काही मर्यादा होत्या. पण आता मोकळा श्वास घेतोय. २०२४ साली भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
 
'विधानसभेच्या तीन निवडणुका आशाताई लढल्या. पण दुर्दैवाने तीनही वेळी घात झाल्याने त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. आता आम्हाला १०० टक्के विश्वास आहे २०२४ साली जुन्नरचा आमदार भाजपचा असेल आणि त्या आशाताई बुचके असतील. गेले अनेक दिवस आम्ही या प्रवेशाची प्रतिक्षा करत होतो. महिला असूनही मुंबईत प्रस्थापित असतानाही आपल्या मूळ गावी गेल्या. तिथे ४ वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या.' असं ही फडणवीस म्हणाले.

'आशाताईंना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. न्याय आणि सन्मानही त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला जाईल. तीनदा जुन्नरमधून आमदारकीची लढत लढून त्या यशस्वी झाल्या नाहीत. पण येणार्‍या निवडणुकीत त्यांना आमदार म्हणून बघायचं आहे.' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.