मुंबई : मुंबईतल्या २०११ पर्यंतच्या झोपडयांना संरक्षण देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.
या निर्णयाच्या माध्यमातून २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या निर्णयाचं संपूर्ण श्रेय भाजप घेणार आहे.
झोपड्यांना संरक्षण देण्याच्या भाजपच्या या निर्णयामागे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तयारीचं गणित असल्याचं बोललं जातंय.
या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शनिवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या विषयावर शिवसेना मंत्र्याची बैठक झाली.
सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप खासदार पूनम महाजन यांनी अलिकडेच जाहीरपणे उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गायले आहेत.
तर फेरीवाला कारवाई प्रकरणात भाजपनं सोईस्कर मौन बाळगलंय.
त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई होत असल्यानं, मराठी-अमराठी तसंच प्रादेशिक अस्मिता आणि हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेची कोंडी होत आहे.
या पार्श्वभूमीवर २०११ पर्यंतच्या झोडप्यांना संरक्षण देण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.