भाजपचे डर्टी पॉलिटिक्स, शिवसेनेला असे डिवचले

भाजपचे डर्टी पॉलिटिक्स अशा शब्दात भाजपावर टीका करणार्‍या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात चार-चार शासकीय जाहीराती छापण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सत्तेत भागीदार असूनही ज्या शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेला डावलण्यात आलं आहे. त्याच कार्यक्रमांच्या या जाहिराती आहेत. जाहिरात देऊन शिवसेनेला डिवचल्याची कुजबूज सुरु आहे.

Updated: Feb 18, 2018, 01:21 PM IST
भाजपचे डर्टी पॉलिटिक्स, शिवसेनेला असे डिवचले title=

दीपक भातुसे, मुंबई : भाजपचे डर्टी पॉलिटिक्स अशा शब्दात भाजपावर टीका करणार्‍या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात चार-चार शासकीय जाहीराती छापण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सत्तेत भागीदार असूनही ज्या शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेला डावलण्यात आलं आहे. त्याच कार्यक्रमांच्या या जाहिराती आहेत. जाहिरात देऊन शिवसेनेला डिवचल्याची कुजबूज सुरु आहे.

निमंत्रण नाही, मात्र पानभर जाहिराती

यातील तीन जाहिराती तर पूर्ण पानभर असून एक जाहीरात अर्धे पान आहे. सत्तेत भागीदार असूनही यापूर्वीही अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेला डावलले गेले आहे. मात्र त्याबाबत नाराजी नाट्य अथवा टीका करण्यापलीकडे शिवसेनेने काहीही केलेले नाही. तसेच अशी टीका करूनही शिवसेनेच्या नेत्यांना कार्यक्रमात स्थान दिले जात नसल्याचे वारंवार घडते आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे भूमीपूजन केलं जाणार आहे. या. कार्यक्रमात भाजपच्याच मंत्री आणि नेत्यांची उपस्थिती असणार आहे. 

काळे झेंडे दाखवून निषेध

या विरोधात नाराजी व्यक्त करताना भाजपचे डर्टी पॉलिटिक्स अशी टीका करणारी बातमी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात छापण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी शिवसेना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे. मात्र सामनात या बातमी बरोबरच या कार्यक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असणारी पानभर जाहीरात छापण्यात आली आहे.

 शिवसेनेच्या भूमिकेबाबत आश्चर्य

दुसरीकडे पंतप्रधानांच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्राचे उद्घाटन आज संध्याकाळी होत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. या कार्यक्रमाची दोन पानभर जाहीरात सामनामध्ये आहे. याशिवाय कंटेनर टर्मिनलच्या उद्घाटन कार्यक्रमाची अर्धे पान जाहिरात छापण्यात आली आहे. एकीकडे स्वाभिमान म्हणून या कार्यक्रमावर टीका करायची आणि दुसरीकडे त्याची जाहीरात छापायची या शिवसेनेच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.