Black and White: 'मविआ काळात माझं, राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला...' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

'षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल याचे प्रयत्न झाले, पण माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत' झी 24 तासच्या Black and White कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खळबळजनक मुलाखत

Updated: Feb 24, 2023, 05:13 PM IST
Black and White: 'मविआ काळात माझं, राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला...' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप title=

Black and White: महाविकास आघाडीच्या काळात (Mahavikas Aghadi) ज्या प्रकारे सुडाचं राजकारण हे केलं गेलं, राजकीय नेते, पत्रकार किंवा विविध क्षेत्रातली लोकं असतील सरकारविरुद्ध बोललात तर तुम्हाला सोडणार नाही, अशी त्यांची कार्यपद्धती होती असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा म्हटलं नाही तरी देखील त्यांना 13 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे योग्य नव्हतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

'मविआ काळात मला टार्गेट करण्यात आलं'
आम्ही राजकीय शत्रू नाही तर वैचारिक विरोधक आहोत. पण मविआ काळात मलाही टार्गेट करण्यात आलं, मला जेलमध्ये टाकण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल असे प्रयत्नही झाले आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत आणि योग्यवेळी मी ते बाहेर काढेन असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. 

'कारण मिळालं असतं तर तुरुंगात टाकलं असतं'
माझ्याविरोधात कारण मिळालं असतं तर मला तुरुंगात टाकलंच असतं, सुपारी दिली होती, पण ज्यांना सुपारी दिली होती, त्यांना माझ्याविरुध्द सबळ पुरावे सापडले नाहीत. दोन वेळा प्रयत्न झाला, पण दोन्ही वेळा प्रयत्न अयशस्वी झाला. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरलं, पण अधिकाऱ्यांनी नकार दिला, काही पुरावेच हाती नाहीत, तर कारवाई कशी करणार असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

अतिशय खालच्या दर्जाला जाऊन मला आणि कुटुंबियांना अडचणीत आणता येईल, यासंदर्भातही बरंच कुभांड रचण्यात आलं होतं, पण योग्यवेळी लक्षात आल्याने आपण ते थांबवू शकलो असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच दररोज सकाळी टीव्हीवर येऊन बोललणाऱ्यांवर त्यांच्या पक्षाने कंट्रोल ठेवला तर राजकीय वातावरण सुधारेल असा सल्लाही त्यांनी दिला.