बीएमसीचं सार्वजनिक वाहनतळ १० वर्षानंतरही बंद, कोट्यवधींचा गैरव्यवहार?

विकासकाला कोट्यवधींचा फायदा करून देण्यासाठीच हा घाट घातल्याचा आरोप

Updated: Aug 1, 2019, 07:15 PM IST
बीएमसीचं सार्वजनिक वाहनतळ १० वर्षानंतरही बंद, कोट्यवधींचा गैरव्यवहार? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : महापालिकेनं मुंबईतलं पहिले बहुमजली सार्वजनिक वाहनतळ ब्रिच कँडी रुग्णालयाजवळ बांधलं खरं, पण १० वर्षानंतरही ते बंद अवस्थेत तर आहेच शिवाय केवळ विकासकाला कोट्यवधींचा फायदा करून देण्यासाठीच हा घाट घातल्याचे समोर येतं आहे. 

मुंबई महापालिकेनं भुलाभाई देसाई रोडवर ब्रिच कँडी रुग्णालयाजवळ शहरातला पहिला बहुमजली सार्वजनिक वाहनतळ प्रकल्प विकासकाच्या माध्यमातून उभा केला आहे. या प्रकल्पातून विकासक आणि पालिका अधिका-यांनी हात धुवून घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. २४० वाहने लागतील असं २० मजली वाहनतळ, कल्याण केंद्रासाठी हॉल आणि सार्वजनिक शौचालय उभारण्याच्या बदल्यात विकासक आकृती निर्माणला पुढील बाजूस हबटाऊन स्काय बे ही पाच मजली व्यावसायिक इमारत बांधण्याची सवलत देण्यात आली. 

२००९ पासून यापैकी ना वाहनतळ सुरू आहे ना कल्याण केंद्र.... इथं सुरु आहे केवळ विकासकाच्या व्यावसायिक इमारतीमधले बार, रेस्टॉरंट आणि त्यांना वापरता येतील हे ध्यानात ठेवूनच बांधलेली चार मजल्यांवरची चार सार्वजनिक शौचालये. इथली पालिकेची जिन्यातली मोकळी जागाही या हॉटेलवाल्यांनी व्यापली आहे. वाहनतळ सुरु व्हावे यासाठी २०१५ मध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांनी तिथं भेट देवूनही पुढं काहीच फायदा झाला नाही. मुळात हे सार्वजनिक वाहनतळ लोकांसाठी नव्हे तर विकासकाला फायदा पोहचवून देण्यासाठीच बांधल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.

जर्मन तंत्रज्ञानाची लिफ्ट बंद असल्यानं वाहनतळ बंद असल्याचे पालिकेकडून सांगितले जातंय. ज्याच्या दुरुस्तीच्या खर्चात नविन लिफ्ट खरेदी केली जावू शकते. मुळात विकासकाकडून पालिकेनं बंद अवस्थेतील वाहनतळ ताब्यात का घेतले, असा प्रश्न निर्माण होतो. सत्ताधारी शिवसेना मात्र केवळ चौकशी करण्याच्या आश्वासनापुढं जात नाही आहे.

मुंबई महापालिका सध्या सार्वजनिक वाहनतळाजवळ अनधिकृत पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करतेय. तर दुसरीकडे याच पालिकेचे अधिकारी वाहनतळ उभारणीच्या निमित्तानं विकासकासाठी कसे राबतात हे दिसून येतं आहे.