Mumbai BMC News: पावसाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसांत साथीच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. या काळात डेंग्यू, मलेरिया तसंच लेप्टोस्पायरोसिस या रूग्णांची संख्या वाढते. या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिका वेळेवेळी उपाययोजना करतात. अशातच लेप्टोस्पायरोसिसला प्रतिबंध करण्यासाठी जून महिन्यात महापालिकेने जवळपास तब्बल 40 हजार उंदीर मारले आहेत.
पावसाळ्यात पाणी साचू नये किंवा रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. यावेळी पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातून येजा करावी लागते. रस्त्यांवरील बिळांमध्ये पाणी शिरल्याने घुशी, उंदीर बाहेर येतात. त्यांचं मलमूत्र साचलेल्या पाण्यात असतं. शरीरावरील विशेषतः पायावर असलेली जखम अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
मुंबईत जूनमध्ये लेप्टोस्पायरोसिसचे 28 रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसलीये. साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर ताप आल्यास औषधोपचारासाठी 8004 नागरिकांना औषधं देण्यात आली आहेत. याशिवाय जूनमध्ये विषारी गोळ्यांचा वापर करून तब्बल 2056 उंदीर मारले आहेत. यानंतर पिंजरे लावून काही उंदीर पकडून २,६२३ उंदीर मारले आहेत. त्याचबरोबर ३४ हजार ९६७ इतके सर्वाधिक उंदीर रात्र पाळीत पकडून मारण्यात आलं आहे.