तीन तासांचा प्रवास 40 मिनिटांत पूर्ण होणार, मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पाला मिळाली मंजुरी

BMC Coastal Road Phase 2: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आता लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 5, 2024, 11:21 AM IST
तीन तासांचा प्रवास 40 मिनिटांत पूर्ण होणार, मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पाला मिळाली मंजुरी  title=
BMCs Coastal Road phase 2 CRZ nod for Versova to Bhayander coastal road

BMC Coastal Road Phase 2: कोस्टल रोडमुळं मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका झाली आहे. वेगवान प्रवासामुळं प्रवाशांचा वेळ वाचतोय. आता मरिन लाइन्स ते वांद्रेदरम्यानच्या कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता मुंबई महापालिका दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती देणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोस्टल रोडला सीआरझेडची मंजुरी मिळाली आहे. 

वर्सोवा ते दहिसर या 18.47 किमीच्या कोस्टल रोडसाठी पालिकेने कंत्राटदार निश्चित केल्यानंतर आता या प्रकल्पाला सागरी व्यवस्थापन क्षेत्र व राज्याची परवानगी मिळाली आहे. वन विभागासारख्या काही महत्त्वाच्या परवानग्या अद्याप बाकी असल्या तरी सीआरझेड परवानगीमुळं या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येतंय. 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. 

दक्षिण मुंबईतून थेट भाईंदरपर्यंत जाण्यासाठी सहा टप्प्यात वर्सोवा-दहिसर-भाईंदरदरम्या कोस्टल रोडची बांधणी करण्यात येणर आहे. त्यानुसार, मरिन लाइन्स ते वरळीदरम्यान कोस्टल रोड प्रकल्पाचे काम ऑक्टोबर 2018मध्ये महापालिकेने हाती घेतले होते. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहेत. वर्सोवा-दहिसर प्रकल्प गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. 

या प्रकल्पाच्या वर्सोवा ते बांगूर-नगर, बांगूरनगर ते माइंडस्पेस मालाड आणि जीएमएलआर, चारकोप ते गोराई आणि दुसरा टप्पा गोराई ते दहिसर आणि तिसऱ्या टप्प्यासाठी दहिसर ते भाईंदर असा असणार आहे. 

किती वेळ लागणार?

नरीमन पॉइंट ते विरार हा प्रवास रस्तेमार्गे करायचा झाल्यास साडेतीन तासांचा अवधी लागतो. पण आता अवघ्या पाउण तासात प्रवास पूर्ण करणे शक्य होणार आहे. कोस्टल रोडमुळं हे अंतर 65 किमीवर येईल. या प्रकल्पामुळं दक्षिण मुंबई ते विरार हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार करता येणार आहे. कोस्टल रोडमुळं दक्षिण मुंबई ते विरार हे अंतर जोडलं जाणार आहे.