मॅचवर सट्टा लावणाऱ्या बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला अटक

भारत श्रीलंका मॅचवर सट्टा लावल्याप्रकरणी बॉलिवूडमधल्या एका बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Sep 27, 2017, 10:02 PM IST
मॅचवर सट्टा लावणाऱ्या बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला अटक  title=

अजित मांढरे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : भारत श्रीलंका मॅचवर सट्टा लावल्याप्रकरणी बॉलिवूडमधल्या एका बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला पोलिसांनी अटक केलीय. अमित अजित गिल असं या आरोपीचं नाव आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

बॉलिवूड आणि सट्टा यांचं जुनं नातं आहे. या नात्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. एका अंडरवर्ल्ड डॉनवर नुकताच एक सिनेमा रिलीज झालाय. त्यातल्या मुख्य अभिनेत्याच्या मेव्हण्याला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केलीय.

अमित अजित गिल असं या आरोपीचं नाव आहे. भारत श्रीलंका सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ सट्टाबाजांना पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी बुकींकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केलं होतं. कॉल रेकॉर्डसवरून पोलिसांना अभिनेत्याच्या मेव्हण्याचा शोध लागला.

अटक केलेल्या बुकींशी संबंध आहे का, किती पैशांचा व्यवहार झाला अशा अनेक गोष्टी शोधण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर अमित गिलला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मात्र आपला त्या मोठ्या अभिनेत्याशी काहीही संबंध नाही असा दावा अमित गिलने केलाय.

ब़ॉलिवूड आणि बुकींचे संबंध जगजाहीर आहेत. अमित हा त्यापैकीच एक असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. एवढंच नाही तर अमितच्या माध्यमातून बॉलिवूडमधले अनेकजण सट्टा लावायचे असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे हे प्रकरण अमित पुरतं मर्यादीत राहतं की बॉलिवूडमधले मोठे मासे यात अडकतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.