ड्रग्स कनेक्शनमध्ये आणखी काही बॉलिवूड स्टार्स NCB च्या जाळ्यात फसण्याची शक्यता

ड्रग्स अँगलची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स ब्युरोच्या हाती काही पुरावे लागल्याची शक्यता

Updated: Sep 8, 2020, 04:11 PM IST
ड्रग्स कनेक्शनमध्ये आणखी काही बॉलिवूड स्टार्स NCB च्या जाळ्यात फसण्याची शक्यता

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. आज ३ दिवसांच्या चौकशीनंतर रियाला अटक करण्यात आली आहे. ड्रग्स अँगलची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने तिला अटक केली आहे. या चौकशीनंतर बॉलिवूडमधील सुमारे 25 सेलिब्रिटी आता एनसीबीच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे. रिया चक्रवर्तीकडे मिळालेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून ही गोष्ट उघड झाले आहे. काही नावे एनसीबीला शोविक आणि रिया चक्रवर्ती यांनी सांगितली आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने ड्रग्स पेडलरकडून इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले. ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कनेक्शन उघडकीस आले आहेत. त्यानंतरच एनसीबीच्या एसआयटी टीमने डोजियर तयार केला आहे.

आता लवकरच या सर्वांना एनसीबीमार्फत समन्स पाठविण्यात येणार असून त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. ही यादी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविली आहे. इतकेच नव्हे तर रिया चक्रवर्तीने एनसीबीसमोर म्हटले आहे की, सुशांतच्या चित्रपटांच्या सेटवर देखील ड्रग्ज वापरली जात होती. त्यामुळे आता येणाऱ्या काळात एनसीबी काय कारवाई करते यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.