'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही

Central Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 27, 2024, 07:28 AM IST
'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही title=
धक्कादायक व्हिडीओ आला समोर

Central Railway Viral Video: मुंबईच्या लोकल ट्रेन हा मुंबई आणि उपनगरातील लोकांसाठी लाइफ लाईन आहेत असं म्हटलं जातं. देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक वर्दळीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपैकी एक असलेल्या मुंबई लोकलमध्ये काही टवाळखोर मात्र स्वत:च्या जीवाबरोबरच इतरांचा जीवही धोक्यात टाकत स्टंटबाजी करताना दिसतात. वेळोवेळी अशा स्टंटबाजीचे व्हिडीओ समोर येत असतात. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तरुण धावत्या लोकल ट्रेनच्या दाराला लटकून प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करत होता. मात्र त्याला ही स्टंटबाजी आयुष्यभरासाठीचा धडा शिकवून गेल्याचं आता समोर आलं आहे. 

काय होतं व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण लोकल ट्रेनच्या दारात लटकून स्टंट करताना दिसतो. लोकल प्लॅटफॉर्मवरुन निघत असताना हा तरुण त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या दाराला पकडून प्लॅटफॉर्मवर पाय ठेवत स्केटींग करत असल्याप्रमाणे स्टंट करताना दिसतोय. डब्यातले इतर प्रवासी त्याला असं करु नको हे धोकादायक आहे, असा इशारा देत असतानाही हा तरुण त्यांचं काही ऐकत नाही. प्लॅटफॉर्म संपण्याच्या काही क्षण आधी हा मुलगा पाय वर घेऊन पुन्हा डब्यात चढतो, असं या व्हिडीओत दिसत आहे.  सांगत आहेत की असं करु नकोस तरीही तो कुणाचंही ऐकत नाही. शेवटी प्लॅटफॉर्म संपायला येतो तेव्हा घाईने तो डब्यात चढतो आहे. 

पोलीस घेत होते शोध, सापडला तेव्हा धक्काच बसला

या तरुणाची स्टंटबाजी पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. पोलिसांनीही या तरुणाचा शोध सुरु केला होता. अखेर काही दिवसांनी या तरुणाचा शोध लागल्यानंतर त्याची जी अवस्था झाली आहे ती पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या तरुणाचा नवा व्हिडीओ मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअऱ करण्यात आला आहे. 

नव्या व्हिडीओत काय दिसतंय...

मध्य रेल्वेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हा तरुण एका खोलीमध्ये गादीवर पाय पसरुन बसला आहे. या तरुणाचा डावा हात आणि पाय त्याने अशाच दुसऱ्या एका स्टंटमध्ये गमावल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं आहे. हा तरुण, "मी अँटॉप हिल येथे राहतो. माझा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मी तो स्टंटबाजीसाठी केला होता. मात्र एप्रिल महिन्यामध्ये असाच एक स्टंट करताना मी माझा एक हात आणि पाय गमावला," असं हा तरुण व्हिडीओत सांगताना पाहायला मिळतो. 

मध्य रेल्वेने काय म्हटलंय?

मध्य रेल्वेने हा व्हिडीओ शेअर करताना, "मध्य रेल्वेने व्हायरल व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्याची ओळख पटवली असून त्याने दुसऱ्या एका स्टंटमध्ये एक पाय आणि हात गमावला आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगाने कारवाई करत त्या मुलाचे प्रमाण वाचवले. आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करतो की असे जीव धोक्यात घालणारे स्टंट करु नका. तुम्हाला असं कोणी करताना दिलसं तर त्यासंदर्भात 9004410735 / 139 इथे कळवा. सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे," अशी कॅप्शन दिली आहे.

थेअटरमध्ये दाखवा हा व्हिडीओ...

अनेकांनी या मुलाला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली असं मत व्यक्त केलं आहे. एकाने तर हे असले व्हिडीओ चित्रपटगृहांमध्ये जाहीरातींप्रमाणे दाखवावा अशी मागमी केली आहे. असे व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवल्यास लोकांच्या मनात भीती निर्माण होऊन कोणी असे स्टंट करायला धजावणार नाही असं मत व्यक्त केलं आहे.