CM नेमके आहेत कुठे? पदभार आदित्य ठाकरेंकडे सोपवावा, चंद्रकांत पाटील यांचा खोचक सल्ला

'आरोग्याच्या कारणाने तुम्ही राज्यावर अन्याय करु नका'

Updated: Dec 21, 2021, 06:48 PM IST
CM नेमके आहेत कुठे? पदभार आदित्य ठाकरेंकडे सोपवावा, चंद्रकांत पाटील यांचा खोचक सल्ला title=

मुंबई : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होतंय. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले.

यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. आरोग्याच्या बाबतीत आम्ही कोणाचं अहित चिंतणार नाही, पण आरोग्याच्या कारणाने तुम्ही राज्यावर अन्याय करु नका. सहानभूतीने राज्य कसं चालणार, किती दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. तुम्ही लवकर बरे व्हा, पण तोपर्यंत राज्याचा कारभार कुणाकडे तरी सोपवावा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

एक दिवस विदेशात जायचं असेल तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कोणावर भरोसाचच नाही, ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या, बाबासाहेब पुरंदरे गेल्यानंतर त्यांना शासकीय इतमामात मानवंदना द्यायची फाईल पाच तास पडून होती, कुणी सहि करायची, अशा व्यक्तींबाबत जर ही वेळ येत असेल तर इतरांचं काय असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिक केला.

त्यामुळे राज्य असं रामभरोसे चालणार नाही, त्यांनी तीन जणांचं एक मंडळ करावं, आणि त्यांच्याकडे चार्ज द्यावा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.